people face many problems in nagpurs kalamna area  
विदर्भ

बापरे! फक्त एक किमी क्रॉस करायला लागतो एक तास, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

चंद्रशेखर महाजन

इतवारी-कामठी रोड (नागपूर शहर) :  विकासाचे वारे सर्वत्र वारे वाहत असताना काही भाग मात्र नेहमीच दुर्लक्षित राहतो. या दुर्लक्षित भागाचे पुढे काय होते, यावरही फारसे मंथन होत नाही. असाच भाग आहे तो नागपुरातील. इतवारी ते जुना कामठी रोड अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. रस्ते आणि रेल्वे विकास आणि प्रगतीची साधने असली तरी कधी-कधी ती अनेकांच्या जिवावर उठतात, हे येथील स्थितीवरून दिसून येते. या भागात रेल्वेचे जाळे आहे. रस्त्यांचेही जाळे आहे. अनेकांना वाटत असेल की, हा भाग फार प्रगत आहे. जसे दिसते तसे असेलच, असे नाही. या भागातील मूळ समस्या सोडविण्यास कोणीही पुढे येत नाही, हे या भागाचे दुर्दैव. 

कामठी मार्गावर एक किलोमीटरच्या आत तीन रेल्वे क्रॉसिंग आहेत. खरी समस्या येथून सुरू होते. एक तासाच्या आत सरासरी १० ते १५ रेल्वेगाड्या या तिन्ही क्रॉसिंगवरून जातात. त्यामुळे लोकांचा दररोज सरासरी एक तास वाया जातो. अपघात झाला तर त्या व्यक्तीला उपचार मिळेल याची शाश्वती नाही. कारण, रेल्वे क्रॉसिंग बंद असेल. रुग्णवाहिका जाणार कुठून? येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पोटे अपघातग्रस्तांना मदत करतात; पण त्यांनाही मर्यादा आहे. सरकार का बरे हा प्रश्न मार्गी लावत नाही? रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो लोकांचा प्रश्न का सुटत नाही?

जिल्ह्यातील अनेक भागांत फिरलो. दगडालाही पाझर फोडणाऱ्या लोकांच्या समस्या बघितल्या. शहरातील काही भागांत फिरण्याचे ठरविले. आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ कळमन्यात असल्याचे कळले. त्या भागातून जाण्यासाठी गजबजलेल्या इतवारीतून निघालो. रस्त्यातच सकाळचे वरिष्ठ बातमीदार चंद्रशेखर महाजन वाट पाहत होते. त्यांच्यासोबत कामठी मार्गावरून निघालो. शांतीनगर कावरापेठला रेल्वे क्रॉसिंग लागले. अरुंद अशा रस्त्यावर हे क्रॉसिंग आहे. शक्य तितक्या लवकर येथून बाहेर पडण्याचे ठरविले. १० मिनिटे झाली तरी गाडी येईना. 

जवळच असलेले लक्ष्मण पोटे यांना विचारले. तेही त्यांच्या गाडीवर होते. त्यांना लवकर घरी जायचे होते. मात्र, गेल्या १० मिनिटांपासून येथे होते. त्यांना घाम येत होता. तसतशी त्यांच्या मनातील घालमेल वाढत होती. शेवटी ते बोललेच. ‘‘भाऊ, काय सांगू रोजची कटकट आहे. रोज एक तास रेल्वे क्रॉसिंगवर जातो.’’ या प्रकाराने धक्काच बसला. गेल्या अनेक वर्षांपासून ही डोकेदुखी आहे. ती कधी दूर होईल, याचाच विचार करतो. पण, ही ब्याद काही जाता जात नाही. निवेदन दिले. आंदोलन केले. धरणे दिले. त्याचा काही उपयोग नाही. त्यांची व्यथा ऐकून वाईट वाटले. अचानक डोळ्यांसमोरून रेल्वे गेली. वाटले, दुसऱ्या मिनिटाला बाहेर पडू. गाडी गेल्यानंतरही गेट काही उघडेना.

पुन्हा १० ते १५ मिनिटे वाट पाहावी लागली. दरम्यान, रेल्वेगाडी गेल्यानंतर गेट उघडले गेले. घडीकडे बघतो तर काय, कावरापेठ रेल्वे क्रॉसिंगवर २५ मिनिटे गेली. बाप रे! मनात धस्स झाले. क्रॉसिंग वेळेबाबत चौकीदाराला विचारले. तो म्हणाला, ‘‘कावरापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील गेट रेल्वे येण्याच्या ७ ते १० मिनिटांआधी बंद होते. रस्ता अरुंद आहे.’’ दोन्ही बाजूंना जवळपास ७०० मीटरपर्यंत रांगा लागतात. क्रॉसिंगवरून रेल्वे गेल्यानंतर मात्र १.४८ मिनिटात ही वाहतूक रिकामी झाली. पुन्हा त्याच ठिकाणाहून रेल्वे आली तर २५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ येथे जातो. या लोकांचा सरासरी १० किमी अंतर गाठण्यासाठी येथे एक तास दररोज जातो.

तीन क्रॉसिंगमुळे वाढला ताप

कावरापेठ क्रॉसिंगवरून पुढे गेल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. जवळपास विचारपूस केली. नागपूर-कामठी भागामध्ये शहरातील १० टक्क्यांपेक्षा अधिक लोक राहत असल्याचे काही उपस्थितांनी सांगितले. १० टक्के लोकांची समस्या सोडविण्याचे धारिष्ट या भागातील लोकप्रतिनिधींमध्ये नसल्याचा आरोपही लोकांनी केला. ७० वर्षांपासून ही समस्या आजही कायम आहे. सुरुवातीला कावरापेठ हे एकच रेल्वे क्रॉसिंग होते. त्यांनतर राजीवनगर येथे दोन रेल्वे क्रॉसिंग झाले. एक किलोमीटरच्या परिसरात तीन रेल्वे क्रॉसिंग झाल्याने लोकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले. राजीवनगर क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंचा विचार केला तर एक किमीपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा होत्या. आम्ही शेवटच्या टोकावर होतो. किती वेळ थांबावे लागेल, हे कोणीच सांगू शकत नव्हते. तिथे रमेश बांगडे हा युवक बोलता झाला. म्हणाला, ‘‘साहेब, येथे दोन रेल्वे क्रॉसिंग आहेत. २० मीटरच्या अंतरावर दुसरे आहे. एक रेल्वे क्रॉसिंगवरील गेट खुले झाले की दुसरी क्रॉसिंग लागते. नशीब चांगले असेल तर लगेच निघता येईल. नाही तर पुन्हा अर्धा येथे थांबावे लागेल.’’ आमचे नशीब चांगले म्हणून दुसऱ्या क्रॉसिंगवर गाडी आली नाही. मात्र, कुतूहलापोटी भागातील लोकांशी चर्चा केल्यानंतर समस्यांचा डोंगर या भागात असल्याचा पुढे आले.

रुग्णवाहिकाही पडतात अडकून

कामठी ते नागपूर मार्गावर कोणताही अपघात झाला तर त्या रुग्णांवर वेळीच उपचार होतील हे सांगता येत नाही. कारण, नागपूरला येणाऱ्या प्रत्येक मार्गावर रेल्वे क्रॉसिंग आहेत. कावरापेठ, राजीवनगर येथे तीन तर कळमना बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर एक असे चार रेल्वे क्रॉसिंग आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका कुठे-ना कुठे अडकून पडते. बऱ्याचदा उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पोटे यांनी सांगितले.

बंद रेल्वेगेटमधून काढतात वाहने

अनेकांना कार्यालयात तर मुलांना शाळेसाठी उशीर होतो. एकाच वेळी तीनपेक्षा अधिक रेल्वेगाड्या गेल्या तर लोकांच्या मनात उशीर होण्याची भीती असते. त्यामुळे ते गेट बंद असतानाही गेटच्या खालून सायकल आणि दुचाकी वाहने घेऊन जातात. त्यामुळे जीव जाण्याची भीती असते. बऱ्याच वेळा जीव गेल्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे.

नियमांचे पालन होत नाही 
अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालक नियमांचे पालन करीत नाहीत. रेल्वे क्रॉसिंगवर आल्यानंतर पोलिस दिसले की कारवाईच्या भीतीने ते लगेच वाहन मागे घेतात. त्यामुळे मागून येणारे वाहन त्यावर आदळते. अनेकदा असे अपघात झाले आहेत. लोकांनी नियम पाळले की अपघात कमी होतील.
-अनिल चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, कामठी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Vote Counting: ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर

IPL Auction 2025: अमरावतीचं पोरगं आयपीएल खेळणार! 'या' संघात झाली निवड, ११ कोटी रुपयांमध्ये झाली खरेदी

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही पोहचले

World Chess Championship 2024: भारताच्या डी. गुकेशला सलामीलाच धक्का; गतविजेत्या डिंग लिरेनचा विजय

Rapper Badshah : रॅपर बादशहाच्या नाईट क्लबमध्ये स्फोट, हल्लेखोर मोटारसायकलवर आले अन्... पोलिसांकडून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT